इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे- रघुनाथराजे निबाळकर यांची टीका
पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : ''मराठा समाज हा पालकत्व करणारा आणि नेतृत्व देणारा समाज आहे. त्याने मराठा समाजातील सर्व वर्गांना जवळ करावे. ज्यांनी इतिहास घडविला त्यांनी तो लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी त्याचे विकृतीकरण केले आहे,'' अशी टीका फलटणचे रघुनाथराजे निबाळकर यांनी केली.'महात्मा जोतिराव फुले इतिहास अकादमी'च्या वतीने 'पहिली मराठा इतिहास परिषद' घेण्यात आली. निंबाळकर यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. अशोक राणा अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, भाई कात्रे, राजारामबापू, डॉ. एस. सी. गंगावार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी निबाळकर म्हणाले, ''एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली, की ती खरी वाटू लागते. अशाच पद्धतीने इतिहासही लिहिला गेला आहे. तथाकथित इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासाचा गळा घोटला आहे. त्याचे बाजारीकरण केले आहे. अशा इतिहासकारांना आम्ही राजघराण्यांनीच डोक्यावर घेतले आहे.'' राजकारण्यांवर टीका करताना ते म्हणाले, ''आता राजघराण्यांचा काळ गेला, सध्या पुढाऱ्यांचा काळ आहे. इतिहास सुधारायचा असेल, तर आधी पुढाऱ्यांना सुधारावे लागेल. पण, सध्याचे राजकारणी जमिनी बळकावण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात पुढे आहेत. या पुढाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मतदान करण्याची गरज आहे.''
प्रा. राणा म्हणाले, ''या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा म्हणजे नेमका कोण, हा प्रश्न निर्माण होतो. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या एका पुस्तकात मराठा कोण, याविषयी म्हटले आहे, 'जो ब्राह्यण नाही तो मराठा.' भारतीय प्राचीन इतिहासातून या विधानाला पूरक संदर्भ आढळतात. पण, मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत मोठी समस्या आहे ती क्षत्तियत्वाच्या मान्यतेची. विशेषत: शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तिचे भीषण स्वरूप पुढे आले आहे. अमराठी राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत यावर आणिखीन वाद झाले. अजूनही ती समस्या सुटलेली नाही. म्हणून या व्यासपीठावर या विषयावरही चर्चा व्हावी, असे वाटते.'कोकाटे, पोकळे यांनीही या वेळी आपल्या भूमिका मांडल्या. परिषदेच्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद होणार आहेत. प्रा. एम. एल. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहिणी कोडीतकर यांनी आभार मानले.
हितसंबंधाच्या कक्षेतूनच इतिहासाचे लेखन : ढमाले .पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वत:च्या हितसंबंधाच्या कक्षेतून माणूस इतिहासाकडे वळतो, त्यातून त्या त्या काळाचा अजेंडा म्हणून इतिहासाची निर्मिती, पुनर्निर्मिती होत जाते. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे लिखाणही अशाप्रकारेच झाल्याचे मत डाव्या चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीच्या वतीने आयोजित पहिल्या मराठा इतिहास परिषदेतील 'शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह' या परिसंवादामध्ये ते बोलत होते. डॉ. उमेश कदम, डॉ. अनिल शिगारे यांनी या परिसंवादामध्ये भाग घेतला.शिवाजीमहाराजांच्या इतिहास लेखनाचे सध्या तीन प्रवाह दिसून येत असल्याचे स्पष्ट करून ढमाले म्हणाले, ''ब्राम्हणेतर चळवळीतून पुढे आलेला प्रवाह, कॉ. शरद पाटील यांनी विकसित केलेला जातिव्यवस्था व स्त्री दास्यमुक्तीचा प्रवाह, डॉ. सदानंद मोरे यांचे वारकरी प्रारूप, अशा तीन प्रकारे शिवाजीमहाराजांच्या इतिहासाचे लेखन केले जात आहे.
ब्राह्यणेतर चळवळ पुढे नेणाऱ्या मराठा सेवा संघाने शिवाजी महाराजांची गोब्राह्यण प्रतिपालक ही ओळख पुसून कुळवाडी भूषण ही ओळख पुढे आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज यांनी जमिनी नसलेल्या जाती- जमातींना पडीक जमिनी कसण्यासाठी दिल्या. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना त्या जाती-जमातींमध्ये निर्माण झाल्याचे कॉ. शरद पाटील यांनी मत मांडले आहे. सदानंद मोरे यांनी तुकोबारायांना अग्रभागी ठेवून इतिहासाची मांडणी केली आहे.''महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवर कुळवाडी भूषण हा पोवाडा लिहिला होता. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे रूपांतर पुढील काळामध्ये ब्राह्यमणेतर चळवळीमध्ये झाले. शिवाजीमहाराज व रामदास स्वामी यांची भेट १६७२ मध्ये झाली तोपर्यंत स्वराज्याची स्थापना झालेली होती. त्यामुळे रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणता येणार नाही. शिवकालीन इतिहासाचा वापर स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये केला गेला. या चळवळीचे शिवाजी महाराज प्रतीक बनले होते, असे ढमाले यांनी सांगितले.